- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates!
ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.
मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्या ज्ञानाने आकाशातील स्वर्ग-देवाचे निवासस्थान नाहीसे झाले. त्यापुढे न्यूटनने गुरूत्वाकर्षण उघड केले. मानवाला आपल्याला पृथ्वीला कोणी जखडले आहे ते कळले. न्यूटननेच शोधलेले गतीचे नियम वापरून विमाने व अवकाशयाने शोधली गेली. आता मानव पृथ्वीच्या बंधनातून मुक्त झाला.
विज्ञानाने विविध भौतिक बंधनातून मानवास मुक्त केले पण मानसिक दुःख व भविष्याची भीती यातून सुटका करण्या साठी त्याची पुजा अर्चा चालूच राहिली! या दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाय विज्ञान येण्या पूर्वीच माहित झाले होते. कोणत्याही देवाला नमस्कार करा तो एकाच ठिकाणी पोहचतो,फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य आनंदाने करा,सर्व गोष्टी विवेकाने व संयमाने करा,एकमेकांवर स्वतःसारखे प्रेम करा. हे सर्व कृष्ण,बुद्ध,ख्रिस्त ते सर्व संत महात्मे सांगून गेले. मानवाच्या दुःखाचे कारण त्याचा एकटेपणा व एकटेपणाचे कारण स्वार्थ! तो सोडून सर्वांवर प्रेम करणे हाच त्या रोगावरचा उपाय आहे. परंतु तो समजून न घेता उपाय सांगणाऱ्यांची पुजा व प्रार्थना सुरू झाली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याऐवजी खरा तो एकची धर्म देवाला प्रेम अर्पावे असा प्रकार सुरू झाला.त्यामुळेच कविवर्य पाडगावकर म्हणून गेले "काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशासी?"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा