मुख्य सामग्रीवर वगळा

आपले शिक्षण

आपले शिक्षण...
शिक्षण म्हणजे काय?
ज्याने माणूस बदलतो, कुटुंब बदलते, समाज बदलतो, देश बदलतो आणि सारे जग बदलते ते शिक्षण! शिक्षण म्हणजे तुमच्या विचारावर आणि आचारावर केलेला संस्कार जो मानवाला तिमिरातून तेजाकडे नेतो, असत्याकडून सत्याकडे आणि मरणातून अमरत्वाकडे नेतो.
     स्वातंत्र्यानंतर नेमलेल्या कोठारी आयोगाने म्हटले आहे आपल्या देशाचे भवितव्य शाळेच्या वर्गातील खोल्यातून घडते. कोठारी कमिशनच्या किती योजना प्रत्यक्षात उतरल्या हा संशोधनाचा विषय आहे. शाळेच्या वर्गातील खोल्यातून देशाचे भवितव्य खरेच घडते आहे का?
     आपण आपले सगळे शिक्षण लेखी परीक्षा व गुण याच्या दावणीला बांधले आहे. लेखी परीक्षा मुख्यत्वे पाठांतर व स्मरणशक्ती यावर आधारीत आहेत. एकेका गुणासाठी स्पर्धा व त्यासाठी विविध प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचा आघार! शिक्षण म्हणजे परीक्षा देऊन मिळणारे सर्टिफिकेट व त्या आधारे मिळणारे पुढील प्रवेश! त्यातून पुढे व्यवसायिक शिक्षण, नोकरी-व्यवसाय, लग्न, संसार... संपत्ती व भौतिक सुख या मागे धावणारा एक रोबोट!
       आपला विद्यार्थी अनेक विषयाचा अभ्यास करतो पण परीक्षा झाल्यावर सगळे विसरून जातो. भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि गणित सगळे विषय शिकून एकाही विषयाचा संस्कार, दृष्टी व कौशल्य यापैकी काहीही त्याच्या पदरात पडत नाही. भाषा शिकून वाचनाची आवड तरी यायला हवी, भूगोल शिकून त्याला  पृथ्वी गोल असून ती स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरते म्हणजे काय ही साधी गोष्ट समजलेली नसते. विज्ञान शिकून अंधश्रद्धा अढळ असतात, चमत्काराला नमस्कार होत असतात! गणित व्यवहारात वापरता येत नाही.
 यासाठी सर्वात जास्त दोष मुलांना दिला जातो पण परिस्थिती उलट असते. सर्वात कमी दोष मुलांचा असतो! मुले पालकांची गुलाम,पालक शिक्षक व शाळेचेे गुलाम, शाळा शिक्षण खात्याच्या व शिक्षण खाते सरकारचे गुलाम! सरकार मधील मंत्री सांगणार ते शिक्षण! सरकारने नेमलेल्या शिक्षण तज्ज्ञानी तयार केलेली पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम हे सर्व गुलाम राबवणार!
         शिक्षणाच्या केंद्रस्थानी विद्यार्थी पाहिजे असे नामवंत मानस शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञ सांगतात पण आपल्या शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहे केंद्रसरकार! केंद्रसरकार नवनवीन विषय व योजना आणते आणि देशातील सर्व त्यांच्या दावणीचे गुलाम ती राबवतात!
         हा शिक्षणाचा  सर्व पिरॅमिड उलट व्हायला पाहिजे. विद्यार्थापासून सुरूवात करायला हवी. प्रकाश आमटेच्या गडचिरोलितील शाळेत शिक्षक प्रथम मुलांची माडिया भाषा शिकतात. त्यातून त्यांच्याशी संवाद साधतात, मग हळूहळू मराठी भाषा शिकवतात. असे देशभर विद्यार्थी केंद्री शिक्षणाचे प्रयोग खाजगी पातळीवर सुरू आहेत त्यांना बळ मिळविण्यासाठी समाजमन तयार व्हायला हवे. शासनाच्या गुलामगिरीतून शिक्षण मुक्त झाले तरच देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल!
        ही सर्व गुलामगिरी पालकांनी मुलांवर लादली तर त्यातून नैराश्य, वैफल्य व आत्महत्त्या या दिशेने मुलांचा प्रवास सुरू होतो. तो आपल्यापुरता थांबवायचा असेल तर मुलांना स्पर्धेचे घोडे न बनवता त्यांना जे शक्य असेल व आवडेल ते शिकू द्या. पास नापास व गुणाचे टक्के या पेक्षा आपल्या संस्कारातून त्याला घडवू या. आणि खरे संस्कार त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करूनच करता येतात हे लक्षात ठेवू या!
    - फ्रान्सिस आल्मेडा, निर्मळ.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...