मुख्य सामग्रीवर वगळा

श्रद्धा व परंपरा

आपल्या रूढी परंपरा आणि श्रद्धा...

फ्रान्स मध्ये जाऊन आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रॅफेल विमाना खाली लिंबू ठेवले आणि विमानावर ओमकार लिहिला. आपल्या परंपरा आणि संस्कृती प्रमाणे त्यांनी पूजा-अर्चा केली. भारतीय संस्कृतीत सगळ्या धर्मात असे प्रकार केले जातात. रूढी परंपरा व संस्कृती हा भावनेचा भाग असतो.राज्यकर्त्यांना निवडून येण्यासाठी या भावनेला दुखावून चालत नाही. घटनेमध्ये काहीही लिहिलेले असो.त्याप्रमाणे चालल्यास निवडून येता येत नसेल तर तसे चालणे राज्यकर्त्यांना परवडणार नाही. मग घटनेप्रमाणे चालायचे कोणी याचा विचार केला पाहिजे. लोक राज्यकर्त्यांना अडचणीत टाकतात. देवधर्म, संस्कृती, रूढी परंपरा यांना पाळणारा भावना जपणारा अशा माणसाला ते निवडून देतात आणि त्याच्याकडूनच घटनेप्रमाणे धर्मांधंता, देवभोळेपणा व अंधश्रद्धा याविरुद्ध वागण्याचीही अपेक्षा करतात. राज्यकर्ते हे आपल्या मधूनच येत असल्यामुळे आपल्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने वागण्याची त्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे माझ्या गाडीला जर मी लिंबू मिरची बांधत असेन तर माझ्या पुढाऱ्यांकडून मी काय अपेक्षा करणार? देशाचा पुढारी हा जनतेचा प्रतिनिधी असतो तो जनतेच्या भावना जगासमोर मांडत असतो. ह्या गोष्टी आपल्या देशातच घडतात असे नव्हे. युरोप-अमेरिकेत,जे विज्ञानात प्रगत समजले जातात तेथेही ख्रिस्ती धर्मांतही कर्मकांडे सर्वात जास्त आहेत, डिव्हाइन ब्लेसिंग, होली वॉटर व हीलींग टच या नावाखाली अनेक अविवेकी श्रद्धा प्रचलित आहेत. सगळ्याच धर्मात व पंथात हे प्रकार आढळतात. म्हणून बदल आपल्यापासूनच करायला हवा. गांधीजी म्हणत असत त्याप्रमाणे 'जो तुम्हाला जगात बदल हवा आहे तो तुम्ही स्वतःमध्ये करा.'
                पंडित जवाहरलाल नेहरू सारखे पंतप्रधान ज्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला, त्यांच्या एवढे भारतीय संस्कृती व रूढी परंपरा यांचे ज्ञान आजकालच्या कोणत्याही पुढार्‍याला नसेल. परंतु त्यांनी कधीही देशाच्या प्रशासनात कर्मकांडे आणली नाहीत. भाकरा नांनगल सारख्या धरणाला त्यांनी नव्या भारताचे मंदिर म्हटले. त्यांच्या दृष्टीने नव्या भारतातील सर्व वैज्ञानिक संस्था हीच खरी देवाची मंदिरे आणि त्या मध्ये काम करणारे वैज्ञानिक हीच खरी देवाची माणसे होती. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारताचे यान मंगळ ग्रहापर्यंत पोहोचले आहे.
           परंतु कालचक्र उलट्या दिशेने फिरायला लागले आहे. अवकाश यान सोडण्यापूर्वी शुभमुहूर्त पाहायला सुरुवात झाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणायच्या हवाई दलाच्या विमानांना संरक्षणासाठी लिंबू मिरचीचा आधार दिला जात आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. काही लोक म्हणतात ह्या श्रद्धा निरूपद्रवी आहेत. त्यामुळे लोकांना बरे वाटत असेल तर त्या पाळायला काय हरकत आहे? हा युक्तिवाद फसवा आहे. जेव्हा लिंबू मिरची आपल्या गाडीची संरक्षण करेल अशी श्रद्धा असेल तर गाडीच्या देखभालीकडे दुर्लक्ष होणार आणि अपघात होणार. म्हणजे ही श्रद्धा निरुपद्रवी नाही. पूजाअर्चा करून आपल्या विमानाची संरक्षण होणार असेल तर त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होणार. कारण नेत्या पासून तंत्रज्ञापर्यंत सर्वांची श्रद्धा असेल आपण केलेल्या पूजाअर्चेने आपल्या विमानांना कोणताही धोका नाही. यामुळेच अशा अविवेकी श्रद्धा टाळल्या तरच आपण व आपला देश समृद्ध व सामर्थ्यवान होऊ शकतो!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.       मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामक...

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...