मुख्य सामग्रीवर वगळा

मुलांवर संस्कार करतांना...

  सर्व पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतात.त्यासाठी संस्कार म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.वर्तणुकीच्या ज्या सवयी व्यक्तीला व समाजाला हितकारक असतात,सुखी जीवन जगण्यास मदत करतात,अशा सवयी चांगल्या संस्कारातून येतात.योग्यवेळी झोपणे–उठणे, खाणे-पिणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, परिसर स्वच्छ ठेवणे, आपले मित्र-सहकारी-शेजारी यांच्याशी चांगले संबंध ठेवणे अशा अनेक गोष्टी चांगल्या संस्कारात येतात. चांगले संस्कार विवेकाने करावे लागतात.

      मुलावरील चांगल्या संस्काराची तयारी मुल जन्माला येण्याच्या अगोदरच नव्हे गर्भधारणेच्या अगोदरच करावी लागते. पतीपत्नी निरोगी बाळाला जन्म देण्यास सक्षम आहेत का हे तपासून पाहण्याची सोय विकसित देशात सक्तीची असतेच, आपणही ती करू शकतो.माता पित्याला असलेले संसर्गजन्य, आनुवांशिक आजार अपत्य जन्मात अडथळा ठरू शकतात तसेच सव्यंग अपत्याच्या जन्मास कारण ठरू शकतात. त्यासाठी बाळाला जन्माला घालण्या पूर्वी पतीपत्नी दोघांची प्रकृती सुदृढ असली पाहिजे. बाळ शारीरिक दृष्ट्या सुदृढ असेल, बौद्धिक दृष्ट्या सक्षम असेल तरच त्याच्यावर चांगले संस्कार अधिक परिणामकारकपणे करता येतील.

     गर्भधारणेच्या काळात मातेला गर्भाच्या वाढीसाठी योग्य आहार मिळाला पाहिजे. त्यासाठी योग्य मार्गादर्शन स्त्रीरोगतज्ज्ञाकडून मिळू शकते. केवळ आहारच नव्हे तर आईचे आचार विचारही बाळावर परिणाम करतात. योग्य व्यायाम व आनंदी विचार यासाठी बाळाचा पिता व इतर कुटुंबीय खूप मदत करूं शकतात. बाळाच्या जन्मापूर्वीच अनेक चाचण्याद्वारे त्याची वाढ व्यवस्थित होत आहे हे कळू शकते. बाळाचा जन्म सुसज्य प्रसूतिगृहात प्रसूतीतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली होणे उत्तम असते.

    बाळाच्या जन्माबरोबर कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरते. पण बाळ  मुलगी असली तरीही तेवढाच आनंद झाला तर ते कुटुंब मुलांवरील संसकारासाठी अधिक योग्य समजावे. जन्मल्या बरोबर बाळाला हाताळण्याचे आईशिवाय इतरांनी टाळावे. बाळाची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते. मोठ्या माणसात असलेल्या रोग जंतूचा संसर्ग बाळाला होऊ शकतो. बाळाच्या माता-पित्यानेही त्याला हाताळतांना योग्य काळजी घ्यायला हवी. हसरे बाळ सर्वांना हवेसे वाटते पण ते हसरे राहण्या साठी सर्वानी योग्य प्रकारे वागायला हवे.

      आपल्याकडे बाळाला आई सोबत झोपवायची सवय असते. परंतु ती सवय धोकादायक व बाळाच्या मानसिक वाढीला हानिकारक ठरू शकते. काही वेळा आईला झोप लागल्यावर तिच्या अंगाखाली गुदमरून बाळाचा मृत्यू ओढवल्याच्या बातम्या येतात तर कधीतरी बाळ  बेडवरून खाली पडून अपघात होऊ शकतो. मानसिक दृष्ट्या, अतिसुरक्षित राहण्याच्या सवयीने बाळ भित्रे होऊ शकते. म्हणून विकसित देशात यासंदर्भात कडक कायदे असतात. बाळाला स्तनपानापुरते जवळ घेऊन बाकीवेळ स्वतंत्र झोपवले जाते.आपल्या देशात तसे कायदे नसले तरीही आपण काही प्रमाणात त्यागोष्टीचे अनुकरण करू शकतो. 

    बाळाच्या वाढीच्या काळात आईंच्या दुधाबोबरच त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष पुरवावे लागते. आईचे दूध हे बाळासाठी अमृत आहे ते जास्तीत जास्त मिळणे हा बाळाचा पहिला अधिकार आहे. आई कामावर जाणारी असल्यास दिवसभरातील दूध काढून घरी आणू शकते. या दुधामुळे बाळाची शारीरिक व मानसिक वाढ योग्यप्रकारे होत असते. त्याची प्रतिकारशक्ती वाढते. बाहेरचा आहार सुरु केल्यावर सतत बाळाला भरवण्याचा उद्योग सुरु होतो. त्याला भूक लागेपर्यंत पालकांनी धीर धरावा. भुके पूर्वीच भरवत राहिल्याने बाळाला खावेसे वाटत नाही. त्याची उपासमार होईल या भीतीने त्याच्या मागे आई-आजी धावत सुटतात. तसे केल्याने आपण त्याला भुक लागल्यावर जेवायची सवय व जेवणातून मिळणारा आनंद हिरावून घेत असतो. काही वेळा जेवणापूर्वी दिलेला अवांतर खाऊ चॉकलेट, चिप्स, कुरकुरे व फ्रुटी इ.भुक नाहीशी करतो. म्हणून लहान बाळाला अतिगोड, तिखट व चमचमीत खाण्यापासून दूर ठेवावे. नाहीतर त्यांना आरोग्यासाठी आवश्यक भाजीपाला, फळे, डाळी इ. आवडेनाशा होतात. जशी मोठी होतील त्याप्रमाणे सकस आहार जेवणात येण्यासाठी सर्व कुटुंबाने चौरस आहार घ्यावा. खाण्याच्या बाबतीत मुलांचे लाड करण्याच्या नावाखाली त्याला आरोग्याला घातक सवयी लावू नयेत.

बाळ शिशु झाल्यावर त्याला शी आणि शू योग्य प्रकारे करायची सवय लावावी लागते. उघड्यावर हे विधी उरकायची सवय आरोग्याला हानिकारक असते. आपल्या घरातील व बाहेरील स्वच्छतागृहे कशी वापरावीत याची सवय लावणे महत्वाचे असते. त्यामुळे वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्य राखायला मदत होते. या सवयी लावतांना ठराविक वेळी बाथरूम मध्ये नेऊन त्यांना ठराविक विधी करायला लावावेत. मात्र कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये. तसेच त्यांच्याकडून चूक झाल्यास मारझोड करू नये तर प्रत्येक चूक ही त्याना नवीन गोष्ट शिकवण्याची संधी मानावी.

शिशुवयात खेळ, धडपड व बडबड या वाढीसाठी आवश्यक गोष्टी असतात. या वयात मुल आपल्या शारीरिक व मानसिक क्षमता वाढवीत असते, भाषेवरचे प्रभुत्व वाढवीत असते, निरीक्षण क्षमता वाढवीत असते आणि विचार करण्याची क्षमता वाढवीत असते. त्यासाठी पालकांची त्याला मदत मिळायला हवी. मुलांबरोबर खेळण्यासाठी, बोलण्यासाठी व त्याच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी जेवढा वेळ द्याल तेवढी ती जास्त प्रगल्भ होतात. शाळेत पाठवण्याची घाईकरून मुलांची नैसर्गिक वाढ आपण अडवीत असतो. त्या ऐवजी घरी मुलाना अधिक संधी मिळेल हे पहावे. त्याला खेळण्यातून, रेखाटण्यातून, रंगवण्यातून व भातुकलीतून शिकण्याची सोय होईल असे पहावे. घराच्या भिंतीवर चित्रे नको असतील तर कोरे कागद किंवा फळा आणून द्यावा.

   मुलांच्या शालापूर्व वयात त्याना सुरक्षित वातावरणात मनसोक्त खेळू द्यावे. सतत त्याच्या मागे राहू नये. लांबून लक्ष ठेवावे. पडण्याची संधी द्यावी. कधीच न पडता मुले सुरक्षित राहणार नाहीत. पडण्याच्या अनुभवातून त्याना सुरक्षित कसे राहावे हे शिकता येते. खूप खेळल्यावर भूक लागते तेव्हा पोटभर खाऊ द्यावा. काही वेळा खेळण्याच्या नादात खायचे विसरतात म्हणून घाबरून जाऊ नये. त्यांना जेवणात नियमितपण यायला वेळ लागतो.             

    थोडी मोठी झाल्यावर ती दुसऱ्या मुलांबरोबर खेळायला लागतात. त्यांच्या सामाजिक वाढीसाठी ते आवश्यक असते. त्यांच्या खेळात पालकांनी हस्तक्षेप करूं नये. त्यांचे प्रश्नं त्याना सोडवू द्यावेत. त्यांची भांडणे पालकांपर्यंत आल्यास त्यांनी मुलांचे ऐकून घ्यावे. त्यांच्या भावना ओळखून बोलावे. पण त्यापारीस्थित काय करता येईल याचा विचार त्यांनाच करू द्यावा. आपण मदत करायला जाऊ नये. त्यामुळे मुलांना स्वतः कठीण परिस्थिती हाताळायची सवय होते.   

       शाळेत जायला लागल्यावर मुलांना अभ्यासाला बसवणे हे एक काम होऊन बसते. आपल्याकडे शिक्षणात मनोरंजकता फारच कमी असल्याने मुले अभ्यासाला कंटाळतात. त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करायचे असेल तर त्यात त्यांना आवडेल अशा गोष्टी कशा आणता येतील ते पहावे. वेगवेगळे शैक्षणिक खेळ, चित्रांची पुस्तके व कम्प्युटर वरील खेळ यांच्या माध्यमातून अभ्यास खूप मनोरंजक करता येतो. योग्य प्रकारे या गोष्टी वापरल्यास मुले त्यांच्या नकळत शाळेत जाण्यापूर्वीच लिहायला-वाचायला शिकतात.

        शाळेतील अभ्यास हा केवळ पुस्तकी अभ्यास नसून व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी कला, खेळ, साहित्य, संगीत, सहली इ.सहशालेय उपक्रम महत्वाचे असतात. शाळेत करायला दिलेले प्रोजेक्ट हे पालकांनी करायचे किंवा रेडीमेड आणायचे नसून मुलांनी स्वतः करायचे असतात. त्यातून ती नवीन गोष्टी शिकत असतात. पुस्तकी अभ्यास एकवेळ शाळेशिवाय होऊ शकत्तो जसा तो कोचिंग क्लासवाले करून घेतात पण इतर उपक्रम ज्यांना मार्क्स नसतात ते शाळे शिवाय होऊ शकत नाहीत. त्यांचे महत्व पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. खऱ्या अर्थाने मुलांचे व्यक्तिमत्व विकसित झाले तरच आपली मुले सुखाचे जीवन जगू शकतील व समाजाला उपयुक्त ठरतील.

     मुलांची हुशारी ही केवळ पुस्तकी घोकंपट्टी पुरता मर्यादित नसते. सचिन तेंडूलकरची खेळातील हुशारी, लता मंगेशकरची संगीतातली हुशारी, जयंत नारळीकरांची विज्ञानातील हुशारी व नाना पाटेकरांची अभिनयातील हुशारी सारखीच नसते. आपण आपल्या मुलाचा खरा कल ओळखून त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आपल्या मनात असेल तसे आपल्या बालकाला बनवण्याचा प्रयत्न केल्यास आपली फसगत व बालकाची जीवनभराची शोकांतिका होऊ शकते. काही वेळा आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता सामन्य असते. तो मोठा डॉक्टर,इंजिनिअर,खेळाडू किंवा शास्त्रज्ञ होऊ शकत नसेल. तरीही तो एक सामान्य नागरिक म्हणून सुखी जीवन जगू शकतो. आपल्या कुटुंबाला व समाजाला उपयुक्त ठरू शकतो. त्याही पलीकडे आपलं मुलं मतिमंदही असू शकतं. त्यासाठीही काम कारणऱ्या संस्था आहेत. त्यांची मदत घेता येते. आपले मुल जसे असेल तसे स्वीकारण्याची तयारी असल्याशिवाय कोणतेही संस्कार करता येणार नाहीत.

        आपले मुल एकमेव आहे हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे आपण त्याची दुसऱ्या मुलाशी तुलना करतो तेव्हा आपण त्याला त्याच्या गुणदोषांसह स्वीकारीत नाही. मुलाची उंची, रंग, बुद्धी इ. त्याला तुमच्या मधून निसर्गाने दिलेल्या गोष्टी आहेत. त्यांचा योग्यतो उपयोग करून त्याला सुखी संपन्न जीवन जगण्यासाठी संस्कार करणे ही तुमची जबाबदारी आहे.   

        पालकाची पादत्राणे मुलाच्या पायात यायला लागल्यावर पालकांनी मुलाना बरोबरीच्या नात्याने वागवावे असे म्हणतात. पण पायाच्या वाढीपेक्षा डोक्याची वाढ अगोदर होते हे लक्षात घेतले तर मुलांबरोबर मित्रत्वाच्या नात्याने वागायला एवढे थांबायला नको. अगदी बालपणापासून त्यांच्याशी मोठ्या माणसासारखे वागलेले त्याना आवडते. आणि तीही मोठ्या माणसासारखी जबाबदारीने वागायला लागतात. वयात येताना त्याना पालकांपेक्षा मित्रांची गरज अधिक लागते. जर पालक मित्र होऊ शकले नाहीत तर मुले मित्रांच्या संगतीत घराबाहेर अधिक  राहतात. मग पालकांना आपले मुलं हाताबाहेर गेल्याचा साक्षात्कार होतो. म्हणून मुलांवर खरोखर संस्कार करायचे असतील तर त्यांचे जवळचे मित्र व्हा.           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...