मुख्य सामग्रीवर वगळा

आवडलेली पुस्तके.. आपुलाची वाद आपणासी

चंद्रकांत वानखडे यांच्या 'आपुला चि वाद आपणांसी' हे आत्मकथन हे एका प्रामाणिक कार्यकर्त्यांचे पारदर्शक असे जीवन चरित्र आहे. कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा न बाळगता केवळ समाजसेवेच्या तळमळीने केलेले कार्य किती प्रभावी असू शकते याचे दर्शन या चरित्रातून घडते.अनेक अडचणीला तोंड द्यावे लागले आणि कोणत्याही प्रकारच्या भौतिक  सुख सुविधा मिळवता आल्या नाहीत तरीही आत्मिक समाधानाने कसे जीवन जगता येते हे चंद्रकांत वानखेडे यांच्या जीवनावरून दिसते.त्यांच्या चरित्रातील मला आवडलेला एक प्रसंग त्यांच्याच शब्दात पुढे देत आहे.......

   एकदा मी व माया गावावरून यवतमाळला जाणार्‍या बस मध्ये बसलो. यवतमाळच्या दिशेने बस धावत होती.मधल्या एका स्टॉपवर बस थांबली. बसमध्ये तीन नवीन प्रवासी चढले.एक गरोदर स्त्री,तिच्या सोबत एक म्हातारी,तिची सासू असावी व एक तरुण जो तिचा नवरा असावा.अत्यंत गरीब परिस्थितीतील ते असावेत हे तर त्यांच्या कपड्यावरून व सोबतच्या समानावरून स्पष्ट दिसत होते.बस मध्ये चढताच सर्वात समोरच्या आडव्या बेंचवर गरोदर स्त्री आडवी झाली.तिच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होती.थोड्या वेळानंतर समोरच्या सीट वरील सभ्य कपड्यातल्या दिसणाऱ्या स्त्रिया समोरचा बेंच सोडून मागच्या सीटवर येऊन बसताना दिसू लागल्या.पटापट एक एक करीत समोरच्या सीटवरून उठून स्त्री-पुरुष मागच्या सीटवर का येऊन बसताहेत याचे आश्चर्य वाटले.म्हणून कुतूहलापोटी समोर पाहिले.तर गरोदर स्त्री बाळंत होत असताना दिसली. दुष्यंत कुमारच्या गझलेतील ओळीप्रमाणे...
'लहू लुहान नजारो का जिक्र आया तो
 शरीफ लोग उठे दूर जा के बैठ गये'
या न्यायाप्रमाणे सज्जन लोक समोरून उठून मागे येऊन बसत होते. एसटी बस मध्ये ती गरोदर स्त्री बाळाला जन्म देत होती. तिच्या सोबतची म्हातारी असहायतेने तर, तिचा नवरा केविलवाण्या नजरेने सर्वांकडे पाहात होता.पण मदत करायचे तर सोडाच, हे दृश्य नजरेसमोर नको म्हणून सभ्य लोक समोरून उठून मागे येऊन बसत होते.
   माझी बायको माया ताडकन उठली. समोर गेली. बाळ जन्माला आले होते. डॉक्टर परिवाराची पार्श्वभूमी असलेल्या व आरोग्यविषयक काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेशी काही काळ संबंधित असल्यामुळे तिला या बाबतीत जुजबी ज्ञान होते.बाळ जन्माला आले आहे पण त्याची नाळ न कापता असेच राहिले तर ते यवतमाळ पर्यंत जगणार नाही. त्यामुळे त्याची नाळ तात्काळ कापली गेली पाहिजे.कोणाकडे धारदार  पात्याचे काही शस्त्र वा ब्लेड व दोरा आहे का ते विचारले.
नशिबाने एका प्रवाशाजवळ ब्लेड मिळाले.दोराही मिळाला. याच दरम्यान बसमधील प्रवाशांची टखळीही सुरू झाली होती.
 'क्या बेकुफ लोग है ये! ये एस टी है, ये क्या जननेकी जगा है?'
यावर दोन चार प्रवासी फिदीफिदी हसले.अशा प्रसंगातही विनोद होतो. त्या विनोदालाही दाद मिळते व सभ्य लोक त्यावर फिदीफिदी हसतात. या गोष्टीनेच माझी तळपायाची आग मस्तकात गेली.
   मायाने कापण्यासाठी ब्लेड हातात घेतले.नाळ कापावे का कापू नये?ज्या ब्लेडने आपण नाळ कापतो आहोत ते निर्जंतुक नसणार.त्यामुळे त्या बाळाचे काही बरे वाईट झाले तर? आणि धावत्या बसमध्ये नाळ कापण्यासाठी निर्जंतुक शस्त्र दुसरे कोणते असणार? नाळ कापले नाही तर बाळ हमखास दगावणार आणि उपलब्ध साधनाने नाळ कापली आणि काही बरे वाईट झाले तर ठपका आपल्यावर येणार. तिच्या मनात सुरू असलेले द्वंद्व तिच्या चेहऱ्यावर घामाच्या रूपात व तिच्या थरथरणाऱ्या हातावरून स्पष्ट दिसत होते. आता तिचा ब्लेड धरलेला हात जास्तच थरथरत होता.तो एका जागी स्थिर होत नव्हता.
"कृपा करून पाच मिनिटासाठी बस थांबवायला सांग."तिने मला म्हटले.मी ड्रायव्हरला काही म्हणायच्या आधीच प्रवाशांनी गलका केला.
  "हमको कोई काम धाम नही है क्या? ड्रायव्हर बस चलने दो."
आता बस मध्ये रिकाम टेकडा मी व माझी बायको एका बाजूला व कामधाम असलेले प्रवासी दुसऱ्या बाजूला अशी सरळ सरळ विभागणी झाली होती.
   मायाने परत काकुळतीला येत म्हटले, "चंदू,प्लीज ड्रायव्हरला बस थांबवायला सांग."
धावत्या बसमध्ये व थरथरणाऱ्या हाताने तिला बाळाची नाळ कापणे शक्य होत नव्हते.
"बस थांबवा" मी जोरात ड्रायव्हरला ओरडलो.
"बस नही रुकेगी" माझ्या पेक्षाही अधिक जोरात एक प्रवासी ओरडला.
नवीन जन्माला आलेला जीव जगण्या-मरण्याच्या झुल्यावर झुलत होता‌. त्याच्या जगण्या मारण्याचे कोणालाही सोयरसुतक नव्हते.गरीब घरची ती स्त्री होती म्हणून तिच्या बाबतचा प्रवाशांचा हा 'सभ्य'  दृष्टिकोन असावा.
 "प्लीज बस थांबव"मायाने परत काकुळतीला येत असहायपणे माझ्याकडे पहात विनवले.
आता मात्र माझाही संयमाचा बांध तुटला होता.
 "बस थांबवा"मी परत ड्रायव्हरला  दरडावून म्हटले आणि त्याच वेळी 'बस नहीं रुकेगी' म्हणण्यासाठी परत तोंड उघडणाऱ्या प्रवाशाच्या थोबाडात धाडकन लगावून दिली. त्या आवाजाने मात्र बस तात्काळ थांबली.
  मायाचा हात थोडा बहुत स्थिर झाला. मीही तिला हिम्मत देत होतो.एका जागेवर तिने दोरा करकचून बांधला आणि मुलाची नाळ कापली.
आता मात्र बसमधील वातावरणात चमत्कारिकरित्या बदल झाला होता. एका प्रवाशाच्या थोबाडीत लगावली यामुळे तो परीणाम झाला होता. की मी एक गुंड माणूस आहे अशी त्यांनी समजूत करून घेतली असावी. या गुंडाच्या नादी कशाला लागता म्हणून तो बदल झाला होता माहीत नाही.
   यवतमाळच्या शासकीय स्त्री रुग्णालयात बाळ-बाळंतिणीला तात्काळ भरती करणे गरजेचे होते. मी ड्रायव्हरला म्हणालो, "बस सरकारी रुग्णालयाच्या दिशेने घे"आता ह्याला कोणीही विरोध केला नाही आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बस रुग्णालयाजवळ थांबताच काही प्रवासी बसमधून उतरून स्ट्रेचर आणण्यासाठी धावले. काहीजण डॉक्टरला शोधून काढीत होते.प्रवाशांनीच स्ट्रेचर आणले.प्रवाशांनीच बाळ-बाळंतिणीला स्ट्रेचर वर उचलून दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांना बाळ-बाळंतिणीला तत्काळ तपासण्यासाठी पार पाडले.आईची तब्येत कशी आहे बाळ सुखरूप आहे किंवा नाही याबाबत डॉक्टरांनी 'बाळाला व त्याच्या आईला कसलाही धोका नाही,असे जाहीर करेपर्यंत सर्वच प्रवासी तेथून म्हटले नाही. बाळ सुखरूप आहे याची खात्री पटल्यानंतरच सर्व प्रवासी बसमध्ये चढू लागले.
    बाळाची नाळ कापण्यासाठी बस दोन मिनिटांसाठी सुद्धा थांबू देण्यास तयार नसलेलेच प्रवासी तब्बल ४५ मिनिटे बाळ सुखरूप आहे, हे ऐकल्यानंतरच तेथून हलले आणि प्रवासी हलल्यानंतर तेथून बस हलली.बाळाच्या जगण्या मरण्याशी सोयरसुतक नसलेली माणसे तीच होती तर त्याच्या सुखरूप असल्याचे वर्तमान ऐकल्याशिवाय तेथून न हललेली माणसेही तीच होती. आधी सैतानाच्या रूपात दिसलेली माणसे नंतर परमेश्वराच्या रुपात दिसली.त्यामुळे माणूस सरसकट चांगला की वाईट हे ठरविण्याचे धाडस कोणी करू नये हेच खरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...