मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक चिंतन

 

धर्म आणि विज्ञान ही दोन्ही मानवी प्रज्ञेची अपत्ये आहेत. प्रज्ञेचा विकास झाल्यामुळे मानवास, भूत-भविष्याची जाणीव, अज्ञाताची भीती, मृत्यूची भीती, सभोवतालच्या निसर्गाची भयावह अभिव्यक्ती व सर्व गोष्टींचे नियमन-निर्मिती ह्याविषयीचे प्रश्न पडण्यास सुरवात झाली. परंतु ह्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देण्याएवढे ज्ञान मात्र मानवाकडे नव्ह्ते. त्यावेळी धर्माने बाळबोध उत्तरे पुरवत त्याची जिज्ञासा पूर्ती करण्याचा प्रयत्न केला. पुढे हळूहळू मानवी निरीक्षण शक्ती व तर्कशक्ती प्रबळ होत गेली आणि विज्ञानाचा विकास सुरु झाला. ज्या  प्रश्नांची उत्तरे धर्माने कल्पनेने दिली होती ती विज्ञानाने प्रत्यक्ष पुराव्यांच्या  आधारे द्यायला सुरुवात केली. परंतु धर्माने पुरवलेला मानसिक आधार देणे विज्ञानाला अजून जमलेले नाही. त्यामुळेच आजतागायत धर्म टिकून आहे. 

 धर्म टिकून राहण्याची कारणे पुढील प्रमाणे सांगता येतील. १) अज्ञाताच्या भीतीवर सोपे तोडगे २) सुखी जीवन जगण्याचे सोपे मार्ग ३) जीवनातील दुखांतून मुक्ती व मोक्षाचा मार्ग ४) मृत्यू नंतरच्या जीवनाचे व आत्म्याच्या अमरत्वाचे आश्वासन ५) मानवाच्या व विश्वाच्या निर्मितीचे हेतू व कर्ता याचे सोपे उत्तर, अशा  काही कारणांसाठी धर्म मानवी मनात टिकून आहे. वरील कारणांचे निराकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

 १) विज्ञानाच्या विकासाबरोबर अज्ञाताच्या भीतीवर मात करणे शक्य झाले आहे. रोग कशामुळे होतात हे कळल्याने त्यावर उपाय योजना करता येते. परंतु अजूनही ज्या क्षेत्रांत अपघाताची किंवा अपयशाची निश्चित कारणे माहित झालेली नाहीत अशा क्षेत्रांतील लोक धार्मिक कर्मकांडाच्या आहारी गेलेले दिसतात; उदा. व्यापारी, चित्रपट निर्माते, क्रीडापटू, मच्छीमार व छोटे शेतकरी इत्यादी. विज्ञान जसे प्रगत होईल  तशी भीतीची कारणे नाहीशी होतील. परंतु तोपर्यंत या लोकांना समाजाने व सरकारने पर्यायी आधार पुरवला तर कर्मकांडाला आळा बसेल.

 २) सुखी जीवनासाठी पुरेसे  उपाय विज्ञानाने शोधले आहेत. शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक आहार, आचार व विचार कसे असावेत हे मानवाला अवगत झाले आहे. मनाचे आरोग्य कसे सांभाळावे ह्याविषयीचेही मनोविज्ञान प्रगत झाले आहे. परंतु ही वैज्ञानिक माहिती सामान्य जनांपर्यंत पोहोचली तर त्यांना धार्मिक तोडग्यांची गरज भासणार नाही.                 

३) दुःखातून मुक्ती देण्याचे काम मोठ्या प्रमाणात वैद्यकीय विज्ञानाने केलेले आहे. सर्वसामान्य आजार पूर्णपणे नियंत्रणात आलेले आहेत आणि मोठ्या दुर्धर आजारावर संशोधन सुरु आहे. हे सर्व उपाय लोकांना सहज उपलब्ध झाले तर नवस-सायास व गंडेदोरे आपोआप कमी होतील. जीवनातील दुःखातून कायमची मुक्ती किंवा मोक्ष ही कल्पना योग्य मनोवैज्ञानिक संकल्पना वापरून बदलता येईल अर्थात त्यासाठी ते मनोविज्ञान सहज उपलब्ध झाले पाहिजे. 

४)मृत्यू नंतरचे जीवन आणि आत्म्याचे अस्तित्व या धर्माच्या अत्यंत लोकप्रिय कल्पना आहेत. कारण त्या माणसाला मृत्युच्या भीतीवर उपाय सुचवतात. जिवंत राहण्याची नैसर्गिक प्रेरणा सर्व प्राण्यांत असते. मानवाला मृत्यूची स्पष्ट कल्पना असल्याने ही भीती अधिक प्रबळ होते. आपल्या सर्व जाणीवा नष्ट होणे, आपण घडवलेल्या, जीव लावलेल्या गोष्टी सोडून जावे लागणे, आपले आप्त स्वकीय दुरावणे अशा सर्व गोष्टी दुःख व भीती निर्माण करणा-या आहेत. यावर उपाय धर्माने असा सुचवलेला आहे की  या जीवनानंतर अधिक चांगले शाश्वत जीवन आहे आणि ते उपभोगण्यास शरीर नसले तरी आत्मा टिकून राहतो. विज्ञान यासाठी  मृत्यू नंतर काय होते याचा शोध घेऊ शकते. आज जगात असे काही लोक आहेत की जे ह्र्द्यक्रिया बंद पडून मृत्यू पावले होते परंतु योग्य उपचार केल्याने अर्ध्या तासानंतरही पुन्हा जिवंत झाले आहेत. त्यांना आलेले अनुभव या धार्मिक कल्पनांशी जुळणारे नाहीत. भविष्यात मृत माणसाला काही दिवस किंवा माहिन्यानी पुन्हा जिवंत करता  येईल. त्यावेळी मृत्यू नंतरच्या जीवनावर व आत्म्याच्या कल्पनेवर कायमचा पडदा पडेल. अर्थात विज्ञान मानवाला दीर्घायू करेल हे आताच दिसायला लागलेले आहे. कालांतराने काही वर्षे मृतावस्थेत राहून मानवाला पुन्हा जिवंत करण्याची किमया विज्ञान साध्य करील. त्यामुळे मानवी जीवन अमर्याद लांबवता येईल. तसेच संपूर्ण मानवी जाणीवा कंप्युटर सारख्या यंत्रात किंवा यंत्रमानवात संक्रमित करता आल्या तर मानवी देहाशिवाय मानवाला अमर्याद जीवन जगता येईल. हेच विज्ञानाने धर्माच्या शाश्वत जीवन आणि आत्मा ह्या कल्पनांना दिलेले उत्तर असेल.

 ५) मानव निर्मितीचा प्रश्न वेगवेगळ्या धर्मांत निरनिराळ्या सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु डार्विनच्या सिद्धांताच्या रुपाने विज्ञानाने अधिक तर्कसुसंगत रितीने त्याचे उत्तर दिले आहे. आपली पृथ्वी सपाट, स्थिर व सर्व विश्वाच्या केंद्रस्थानी आहे अशी कल्पना केल्यामुळे पृथ्वी कशाच्या आधारावर आहे ह्याचे स्पष्टीकरण प्रत्येक धर्माने सोप्या पद्धतीने दिले आहे. खगोलशास्त्राच्या प्रगतीनंतर पृथ्वी गोल असून ती सुर्याभोवती फिरते ह्या निरिक्षणाशी जुळणा-या सिद्धांताचा उदय झाला. त्यामुळे पृथ्वी कशावर आधारलेली आहे हा प्रश्न निकालात निघाला. विश्व निर्मितीचा प्रश्नही, प्रत्येक गोष्ट किंवा वस्तूच्या निर्मितीसाठी एक कर्ता असतो, ह्या मानवी अनुभवाशी निगडीत आहे. भविष्यात हा प्रश्नही मानवी अनुभवाच्या पलीकडे असलेल्या एखाद्या संकल्पनेतूनच सुटेल. त्यानंतर विश्वाचा निर्मात्याविषयीची प्रश्न उरणार नाही.

वरील कारणांव्यतिरिक्त, मानवाच्या अंगवळणी पडलेली कर्मकांडेही धर्म टिकून राहण्यास कारणीभूत ठरतात. मानवी संस्कृतीत मुलांना वाढविताना सतत विशिष्ट प्रकारे तथाकथित संस्कारांच्या नावाखाली काही गोष्टी त्यांच्या अंगवळणी पाडल्या जातात (कंडिशनिंग). त्यामुळे मोठेपणीही अनाहूतपणे विशिष्ट धर्माची, विवेकाशी विसंगत अशी कर्मकांडे आचरली जातात. अधुनिक मनोविज्ञानावर आधारित आणि विवेकाशी सुसंगत अशा शिक्षणपद्धतीने मुलांना वाढविल्यास मोठेपणी तर्कविसंगत कर्मकांडांपासून त्यांना मुक्ती मिळेल.

मानवाच्या सुरवातीच्या विकासात धर्माने त्याला दिशा दिली. आता वैज्ञानिक पद्धतीचा इतका विकास झाला आहे की जीवनाच्या सर्व क्षेत्रांत तिचा वापर केला जात आहे. धर्मातील संकल्पनांचाही तपास वैज्ञानिक पद्धतीने करायला सुरवात झाली आहे. त्यामुळे भविष्यकाळात आइनस्टाइनचा प्रसिद्ध विचार “धर्म विज्ञानाशिवाय आंधळा आहे आणि विज्ञान धर्माशिवाय पांगळे आहे”, प्रत्यक्षात उतरेल आणि धर्मही विज्ञानाच्या नजरेने पहायला शिकेल.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...