मुख्य सामग्रीवर वगळा

तीर्थक्षेत्र

जीवंत मानवी देवांचे तीर्थक्षेत्र…

आनंदवन ,हेमलकसा आणि सोमनाथ

बंधन टूरच्या आनंद वारी सोबत आम्ही या तीर्थक्षेत्राची सहल करुन आलो.

आनंदवन म्हणजे भूतकाळावर मात,

लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे वर्तमानकाळाला साथ

आणि सोमनाथ प्रकल्प म्हणजे भविष्य काळाला हात!

आनंदवन,वरोरा

        महारोगाने विद्रूप झालेल्या मानवी देहातील चैतन्य कामाला लावून फुलवलेले नंदनवन! या नंदनवनाचा आद्यमाळी महामानव मानवी देहातील देव बाबा आमटे! समाजाने तिरस्काराने टाकून दिलेले बेवारस मानवी जीव सन्मानाने उभे करण्याचे काम बाबांनी केले. शेती,बागा,हस्तकलाकेंद्र,हातमाग,यंत्रमाग,तांत्रिक कार्यशाळा, शाळा व कॉलेजे एक स्वयंपूर्ण वसाहत जी बाहेरच्या जगाला विविध उत्पादने पुरविते. हाताला बोटे नसलेले लोक निरोगी लोकांना तोंडात बोट घालायला लावणारी काम करीत आहेत!

                             ज्यांची बोटे रोगाने हिरावून घेतली आहेत असे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे रोगमुक्त महारोगी घेऊन वरोऱ्याच्या उजाड माळरानावर बाबांनी पहिली झोपडी उभारली.आज तेथे रोगमुक्त महारोग्याची स्वयंपूर्ण वसाहत आत्मविश्वाने उभी आहे.बाबांनी ही माणसे केवळ रोगमुक्तच केली नाहीत,तर त्यांना भीती, अंधविश्वास व रुढी परंपरांच्या जोखडातून मुक्त केले.तेथील एकेक माणसाशी बोलल्यावर कळते त्यांची विवेकी विचारसरणी,बाबांच्या विचारांनी ठासून भरलेली ही माणसे बाबांचे रूप घेऊन वावरतात! आम्हाला माहिती देणारे परांजपे काका बाबांच्या कर्तृत्वाविषयी भरभरून बोलत होते.काकाच्या मुखाने जणू बाबाच बोलत होते.त्यांनी आम्हाला बाबांना दफन केलेली जागा दाखवली.त्यांच्या दफन भूमीवर फक्त एक झाड उभे आहे.ते डवरलेले झाड सांगते ऐका महामानवाची कथा! ठिकठिकाणी जगातील विचारवंतांचे विचार ठळक अक्षरात लिहिलेल्या पाट्या आहेत.

आनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत वाटत नाही, ती तर वाटते मुक्त महामानवांची अपूर्व नगरी!

लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा,

      घनदाट जंगलात रानटी श्वापदांच्याआणि विषारी सापांच्या सहवासात उभे आहे एक स्वप्न संकुल.अतिदुर्गम भाग.अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टीचेच नव्हे तर पाण्याचेही दुर्भिक्ष! रस्ते वीज वाहने या शहरी सुविधांची तर कल्पनाही करता येणार नाही अशा जागी बाबांनी आपल्या सुपुत्राला पाठवले.खरेच एक देवपुत्र या घनदाट जंगलात उतरला.प्रकाश बाबा आमटे!अज्ञान,अनारोग्य,अंधश्रद्धा अशा घनदाट अंधारात प्रकाश देणारा सूर्य उगवला! झोपडीत थाटलेल्या दवाखान्यात औषधोपचार सुरू झाले.भुताखेतावर विश्वास ठेवणारे आदिवासी आधुनिक औषधापासून लांब पळायचे! त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना रोगमुक्त करता करता घनदाट जंगलात एक हॉस्पिटल उभे राहिले. शिक्षणाअभावी आदिवासींची होणारी पिळवणूक आणि अज्ञानामुळे सहन करावे लागणारे अत्याचार न पाहवून त्यांना सज्ञान करण्यासाठी शाळा उभारण्यासाठी संकल्प झाला. सामाजिक बांधिलकी मानणारे निष्ठावान सहकारी मिळाले आणि विद्यालय आकाराला आले. येथील आदिवासींची मायबोली मराठी पेक्षा पूर्णपणे वेगळी त्यांना मराठीतून शिकवण्यापूर्वी शिक्षकांनी त्यांचीच भाषा शिकायला सुरुवात केली. सर्व अडचणीवर मात करून या आदिवासी मधून आज शिक्षक,डॉक्टर व इंजिनिअर झाले आहेत! आता तर प्रकाश आमटेचे सुपुत्र अनिकेत आमटे यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. आदिवासी मुलांना केवळ शिक्षणाचीच नव्हे तर राहण्याची खाण्यापिण्याची देखील सोय येथे केली जाते आणि तीही विनामूल्य!

                       प्रकाश आमटे माणसावरच केवळ प्रेम करून थांबलेले नाहीत त्यांनी अनाथ प्राण्यांनादेखील आपल्या आश्रयाला घेतले आहे. त्यांच्या आमटज आर्कमध्ये मगर,सुसर,ससे,हरीण,माकड आणि बिबळे एकत्र नांदतात. साप देखील अंगाखांद्यावर खेळतात!

     सोमनाथ प्रकल्प आणि श्रमसंस्कार छावणी.महारोडा.

        ताडोबाच्या अभयारण्याला लागून असलेल्या साडेबाराशे एकर क्षेत्रावर बाबांनी हा महाप्रकल्प उभारलाय!येथून तिनही प्रकल्पासाठी अन्न,धान्य, भाजीपाला व फळे पिकवली जातात व उरलेले खुल्या बाजारात विकले जाते! अशाप्रकारे सर्वांच्या,आताच्या व भविष्यातील उपजिविकेचा प्रश्न सोडवून ठेवलेला आहे!

           याच  प्रकल्पावर भारतभरातील युवकांची श्रमसंस्कार छावणी उन्हाळ्याच्या सुट्टीत घेतली जाते. या संस्कारासाठी प्रतिवर्षी देशभरातून हजारो विद्यार्थी हजेरी लावतात. जाताना हाताने कष्ट करण्याचा संस्कार आणि बाबांची त्याग व समाजसेवेची शिकवण सोबत घेऊन जातात. या श्रमसंस्कार छावणी साठी टाटा उद्योगसमूहाने रंगमंच व विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करून दिली आहे.

                   या प्रकल्पावर बरे झालेल्या कुष्ठरोग्यांची राहण्यासाठी सुसज्ज घरे आहेत. सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज घरात राहणारे हे सुसंस्कृत रहिवासी कोणत्याही पांढरपेशा शहरी नागरिकांपेक्षा उजवे आहेत त्यामुळेच शेजारच्या परिसरातून तेथे शेतीच्या कामासाठी येणाऱ्या तरुणी त्यांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी विवाहबद्धही झालेल्या आहेत! बाबांच्या कामाचे  हे सर्वात मोठे यश आहे!

                   तिन्ही प्रकल्पावर जेवणासाठी स्वतंत्र भोजन गृहे आहेत.कोणीही स्वतःचे भोजन स्वतः तयार करीत नाही. प्रत्येक भोजन गृहावर काम करणारा गट एक महिना काम करतो. त्यामुळे या प्रकल्पावरील प्रत्येक माणूस वर्षातील अकरा महीने भोजन स्वतः तयार न करता जेवू शकतो! सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की आमटे कुटुंबीयांपासून सर्वजण ह्या भोजनगृहात तयार झालेले शाकाहारी जेवण जेवतात! ज्यांची स्वतःची घरे व कुटुंबे आहेत असे लोकही भोजन गृहांतून डबे घेऊन जातात. आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प हे दोन्हीही बाबांचे मोठे सुपुत्र विकास आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. या प्रकल्पावर आम्हाला माहिती देणारे हरिभाऊ पाटील हे तर एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाला शोभेल अशा भाषेत बाबा आमटे आणि त्यांचे सुपुत्र यांच्या कर्तृत्वाचा आलेख उभा करीत होते!

        या तिन्ही प्रकल्पावर कोठेही देवदेवतांच्या किंवा थोर पुरुषांच्या मूर्ती  किंवा मंदिरे नाहीत!(बाबांची देखील मुर्ती नाही)

   मात्र अनेक ठिकाणी जगभरांतील विचारवंतांचे विचार असलेल्या पाट्या लावलेल्या आहेत!

         असे हे तिर्थशेत्र जेथे मानवाच्या रूपात देवदूत वावरतात आणि अंधश्रद्धेच्या जगात विवेकाचा प्रकाश पसरवतात!

            (माणसाने माणसाशी माणसा सारखे कसे वागावे हे शिकावे या तिन्ही प्रकल्पावर वावरणाऱ्या माणसांकडून!)



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रद्धेचे विज्ञान....पुस्तक

http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/shraddheche_vidnyan_francis_almeida.pdf श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा आणि अंधश्रद्धा वेगळी असते का? श्रद्धेचा आपल्या जीवनात काही उपयोग असतो का? संस्कृतीच्या विकासात काही श्रद्धा उपयोगी ठरल्या आहेत का? नेहमीच्या जगण्यात.. श्रद्धा उपयोगी किंवा निरुपयोगी असतात का? श्रद्धा उपद्रवी किंवा निरूपद्रवी असतात का? श्रद्धांचा संबंध विवेकाशी असतो का? विवेकाने श्रद्धा बदलता येतात का? श्रद्धाच्या मागे काय विज्ञान आहे? सगळे श्रद्धेचे विज्ञान वाचल्यावरच कळेल!

धार्मिक

श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण.विश्वासाला अनुभवाचा आधार असतो. श्रद्धा ही अनुभव येईल असे गृहीत धरते. परंतु विश्वासाची पुढची पायरी श्रद्धा ही आहे‌.कारण ज्या गोष्टीचा अनुभव नाही परंतु त्या माणसाला हव्या असतात त्या गोष्टी श्रद्धा काल्पनिकरीत्या पुरवते. आजार बरा करण्यासाठी आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो कारण त्यांचा तसा अनुभव आपल्याला आलेला असतो. परंतु असाध्य रोग बरा करण्यासाठी डॉक्टर असमर्थ असेल तर आपण ते सामर्थ्य असलेला देव निर्माण करतो.त्यामुळेच असाध्य रोगाला किंवा असाध्य वाटणार्‍या संकटाला तोंड देण्याएवजी लोक बाबा-बुवा स्वामी यांच्या भजनी लागतात. त्यामुळे काही काळ आपल्याला बरे वाटते.असाध्य रोगातून बरे झालो नाही तरीही आपल्याला या काल्पनिक देवाचा आधार वाटतो.यालाच श्रद्धा म्हणतात. श्रद्धेमध्ये शंकेला जागा नसते. शंका घेतली तर आपली श्रद्धा सफल होत नाही असे अगोदरच मनावर ठसवलेले असते.त्यामुळे शंका निर्माण करणारी माणसे ही श्रद्धवंतांना धोकादायक वाटतात. आपली श्रद्धा डळमळीत होणे त्यांना सहन होत नाही. शंका घेण्याची त्यांना विलक्षण भीती वाटते.म्हणूनच श्रद्धाळू माणसे शंका निर्माण करणा...

ज्ञानाचे सामर्थ्य

- सा विद्या याविमुक्तये | That is knowledge which liberates! ज्ञान आपल्याला मुक्त करते. रोग का होतात हे माहित नव्हते तेव्हा लोक देव देवतांची पुजा प्रार्थना करायचे. कारण रोग हे देवाच्या कोपामुळे होतात असे लोक मानायचे. गावात देवी सारख्या रोगाची साथ आली की ग्राम देवतेची पुजा, प्रार्थना व नवस सुरू व्हायचे. काही लोक रोगाला बळी पडायचे तर थोडे नशिबवान वाचायचे! मेले ते दुर्दैवी व वाचले ते सुदैवी! वाचले ते म्हणायचे 'देव तारी त्याला कोण मारी'आणि मेले त्यांच्यासाठी 'देव मारी त्याला कोण तारी' असे समजायचे! एकूण देव करता करविता. विज्ञानाने जंतूचा शोध लावला. रोगाचे कारण कळले. देवी प्रतिबंधक लस आली व देवीचा कोप संपला.रोगाचे कारण समजले, त्यावर उपाय शोधला गेला व मानव त्या रोगातून मुक्त झाला. ज्ञानाने त्याला पुजा,प्रार्थना व नवस यातून मुक्त केले.           मानव पृथ्वीला जखडला होता,आकाशातील ग्रह तारे म्हणजे त्याच्या देव देवता होत्या! म्हणून स्वर्ग-देवाचे निवासस्थान वर आकाशात आहे असे त्याला वाटायचे!पण गॅलिलियोने आपली  दुर्बीन आकाशाच्या दिशेने रोखली व सारे ग्रह तारे जवळ आले. त्य...